Monday, January 19, 2026

लोकांची न संपणारी क्रूर चेष्टा

राजू कोर्ती   
लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, असे आपण अजूनही अभिमानाने उच्चारतो. पण आरसा समोर धरला तर दिसते ती सत्तेची नाही, तर लोकांच्या हतबलतेची विदारक कहाणी. ज्यांच्या नावावर सत्ता उभी आहे, तेच लोक आज सर्वात जास्त फसवले जात आहेत, हे कटू सत्य स्वीकारायला आपण तयार नाही. ही चेष्टा साधी नाही, ही क्रूर चेष्टा आहे.

ह्यांचे आमदार त्यांच्या संपर्कात, त्यांचे खासदार ह्यांच्या संपर्कात, नगरसेवकांची फोन डायरी म्हणजे सत्तेची अदलाबदल करणारे चलन झाले आहे. प्रत्येक पाऊल राजकीय खेळीच असायला हवे का? माणूस म्हणून, विचारधारा म्हणून, तत्त्व म्हणून काहीच उरले नाही का? मग ज्याला तुम्ही कालपर्यंत छातीठोकपणे आयडिओलॉजी म्हणत होता, ती आज इतक्या सहजपणे कशी विसरता येते? आणि त्याहून धक्कादायक म्हणजे, ती विसरलेली गोष्ट लोकांसमोर निर्लज्जपणे कशी मिरवता येते?

मी माझ्या ४५ वर्षाच्या कारकीर्दीत अनेक स्तरावरच्या निवडणुका आणि शेकडो राजकीय घडामोडी कव्हर केल्या पण इतकी दारुण अवस्था कधीच बघितली नाही. पंचेचाळीस वर्षे निवडणुका, सत्तांतर, उठाठेव पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की राजकारणात चांगले आणि वाईट लोक सगळ्याच पक्षांत होते आणि आहेत. पण पूर्वी किमान मनाची तरी लाज होती. शब्दांना किंमत होती. आज ती लाजही संपली आहे. आता फक्त सोयीची तत्त्वे आणि गरजेपुरती विचारधारा. कमरेचेच नव्हे तर डोक्यालाही गुंडाळायचे सोडून दिले आहे. गुंडाळायचे असते ते फक्त लोकांना.

लोकप्रतिनिधी नावाचा शब्दच आता विनोद ठरतो आहे. ज्याला आपण मत देतो, तो दुसऱ्याच दिवशी आपल्याला कवडीमोल समजून पूर्णपणे विरोधी विचारधारेच्या पक्षात प्रवेश करतो. ह्याला ‘राजकीय चाल’, ‘रणनीती’, ‘खेळी’ असे गोंडस शब्द लावले जातात. प्रत्यक्षात ही उघड गद्दारी असते, पण तिच्यावर शब्दांचा मुलामा चढवून लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. पक्ष गेले खड्ड्यात, विचारधारा गेली खड्ड्यात. उरते ते फक्त सत्ता.

आणि मग तयार होते दुचाकी, तीनचाकी, कधी ट्रकभर बहुमताचे सरकार. लोकांची कामे करणे हा त्यांचा उद्देश नसतोच. सगळी ऊर्जा, सगळी तथाकथित हुशारी सत्ता टिकवून ठेवण्यात खर्ची घातली जाते. सामान्य माणसाचे प्रश्न, त्याचे दुःख, त्याची घुसमट ही फक्त निवडणुकीपुरती घोषणाबाजी. मतदान झाल्यावर लोक म्हणजे ओझे.

ज्यांच्या शब्दकोशात प्रामाणिकपणा खिजगणतीतही नाही, तेच लोक मोठ्या आवाजात लोकांना मतदानाचे धडे देतात. “लोकशाही मजबूत करा” असे सांगतात. पण लोकांची जबाबदारी फक्त त्यांच्या तुंबड्या भरण्याची आहे का? त्यांच्या निर्लज्ज थेरांचे प्रेक्षक बनण्याची आहे का? लोकशाही हा शब्दच इतका झिजला आहे की तो उच्चारताना उपहास वाटतो.

या सगळ्यात सर्वात मोठा मूर्ख कोण ठरतो? तो मूर्ख म्हणजे आपण. आतल्या गोटात काय शिजते आहे, हे जाणून घेण्याचीही गरज न वाटणारा, सगळे गिळून टाकणारा, आणि तरीही दर पाच वर्षांनी आशेने उभा राहणारा सामान्य नागरिक. दुर्दैव असे की बहुसंख्य लोकांना आपण फसवले जातोय, हेही कळत नाही. आणि ज्यांना कळते, ते मतदानापासून दूर का जातात, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना जाणून घ्यायची इच्छाच नसते.

हे विदारक दृश्य कधी बदलेल? की आपण फक्त आशेवर जगायचे आणि आशेवरच मरायचे? प्रश्न विचारणारा माणूस आज संशयास्पद ठरतो, आणि निर्लज्जपणाला शहाणपणाचे लेबल लावले जाते. ही लोकशाहीची शोकांतिका नाही, तर लोकांच्या संयमाची परीक्षा आहे.

जोपर्यंत लोक स्वतःला फक्त मतदार नव्हे तर नागरिक समजणार नाहीत, तोपर्यंत ही क्रूर चेष्टा थांबणार नाही. सत्तेच्या खुर्च्या बदलतील, चेहरे बदलतील, पक्ष बदलतील. बदलणार नाही ती लोकांची हतबलता. आणि हीच या सगळ्याची सर्वात मोठी, सर्वात भीषण शोकांतिका आहे.

No comments:

Post a Comment

लोकांची न संपणारी क्रूर चेष्टा

राजू कोर्ती    लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, असे आपण अजूनही अभिमानाने उच्चारतो. पण आरसा समोर धरला तर दिसते ती सत्तेची नाही, तर लोकांच्या हत...