राजू कोरती
कोण्या एकेकाळी मुंबईतील सर्वसामान्य गिरणी कामगाराचे खाद्य समजले जाणाऱ्या वडापावने आज बरीच मजल मारली आहे. ज्याला मुंबईकर कौतुकाने बॉम्बे बर्गर असे संबोधतात त्या वडापावला जरी अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असले तरीही त्याला जागतिक दर्जा कोणी आणि केंव्हा दिला ह्यासंबंधी कसली ही माहिती उपलब्ध नाही. अर्थातच काही अतिउत्साही लोकांनी वडापाव विदेशात पण भारतीय आवडीनं खातात म्हणून त्याचा जागतिक पातळीवर उदो उदो केला असावा. ह्यात खरे तर आक्षेपार्ह असे काहीच नाही. मुंबईकरांसाठी वडापाव हा केवळ पोट भरण्याचा खाद्यपदार्थ नसून एक खोलवर रुजलेली भावना आहे. वडापाव बरोबर त्यांचे एक भावनिक नाते आहे,"
.
.
जागतिक वडापावच्या निमित्ताने बऱ्याच वडापाव प्रेमींनी तर सामाजिक माध्यमातून "वडापाव महात्म्य, वडापाव चालिसा" व इतर तत्सम स्तोत्र रचुन त्याचा यथोचित गौरव केला. मात्र समाजातील तळागाळापासून ते श्रीमंतापर्यंत सगळे वडापावचे आस्वाद घेणारे असल्यामुळे हा महाराष्ट्रातील, खास करून मुंबईतील लोकांसाठी. सर्वधर्मसमभाव आहे. वडापाव जातपात, धर्म बघत नाही. तो खऱ्या अर्थाने 'सेक्युलर' आहे आणि म्हणूनच त्याचा जोड फेविकॉल पेक्षाही मजबूत आहे.
संशोधनाअंती लक्षात येईल की वडापावला तसा फारसा मोठा इतिहास नाही. दादर येथिल अशोक वैद्य आणि सुधाकर म्हात्रे ह्यांनी हा उपक्रम १९६६ मध्ये सुरू केला. तेंव्हा या जोडगोळीला पुसटशीही कल्पना नसणार की ५० वर्षानंतर वडापाव आणि त्यासोबत मिळणारी लाल लसणाची चटणी हे साता समुद्रा पलीकडे छलांग मारून आपले एक स्वतःचे प्रस्थ निर्माण करतील. आज वडापावने इतर राज्यामध्ये ही आपली लोकप्रिय घोडदौड चालू ठेवली आहे.
बहुतांश वडापाववाले आज खोऱ्याने पैसा ओढताहेत. त्यांच्या अवताराकडे बघू नका. सरासरी रोजचे १०,००० ते २५,००० चा गल्ला असतो. मला वाटते कुठे तरी सरकारने ह्याची दखल घेउन वडापावला आपला ब्रँड ambassador खाद्यपदार्थ बनवायचे मनावर घ्यायला हवे. हे फारसे कठीण नाही. वडापाव मध्ये थेट परकीय गुंतवणूक करण्याचे मनोगत सरकारने व्यक्त करायची खोटी की विदेशी निवेशकांची रीघ लागेल. विदेशी चलनाची तूट भरून काढता येईल. आणि हे जेंव्हा होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने वडापावचे जागतिकीकरण होईल.
धंदा, भांडवल व लोकभावनेची सांगड घालून वडापाव जगाच्या प्रत्येक देशात आपला ठसा उमटवू तर शकेलच, शिवाय तेथील बर्गर संस्कृती वर देखील मात करू शकेल. देशात सध्या स्वदेशीवर भर देण्यात येत आहे. स्वदेशी जागरण मंच व तत्सम संस्था ह्यात मोलाचा पुढाकार घेऊ शकतात. मात्र वर्षातील केवळ एक दिवस वडापावाचे गुणगान करून भागणार नाही. सध्या तरी काही भारतीय विदेशात वडापाव विकताहेत आणि त्याला मागणी पण बऱ्यापैकी आहे असे समजते पण त्याला अजून चालना देण्याची गरज आहे.
वडापावचे जागतिक ब्रँडिंग करायची धुरा मी खांद्यावर घेण्यास तयार आहे. त्या संदर्भात अनेक कल्पना माझ्या मनात घोंगावतायत. दुर्दैवाने त्यांना सध्या तरी कोणी वाली नाहीये. त्यामुळे इंग्रजीतील Charity begins at home ह्या उक्ती प्रमाणे मी सुरवात रोज स्वतः दोन वडापाव खाउन करू शकतो.
वाजली तर पुंगी नाही तर वडापाव!
No comments:
Post a Comment