Wednesday, May 26, 2021

चक्रीवादळांच्या निमित्ताने हवामान भौतिकशास्त्र 

राजू कोरती
मागील वर्षी आलेली एका पाठोपाठ दोन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे अम्फान व निसर्ग आणि इतक्यातच येऊन गेलेल्या ताउक्ते व येऊ घातलेल्या यासच्या निमित्ताने काही आठवणी उजागर झाल्या. शाळेत भौतिकशास्त्र हा माझा लाडका विषय होता पण त्याचा संबंध हवामानाशी असू शकतो असे खिजगणतीत सुद्धा नव्हते.

पुढे वर्तमानपत्रात काम करताना हवामान विषयिक बऱ्याच बातम्या व लेख लिहिण्याचे प्रसंग आले. त्याचे विश्लेषण करताना जाणवले की हे विज्ञान भौतिकशास्त्राचाच अविभाज्य अंग आहे. त्या कुतूहलात भर पाड़ली ते माझ्या हाती अकस्मात् पडलेल्या Climate Physics ह्या पुस्तकाने.

जवळ जवळ ६०० पानी असलेल्या ह्या पुस्तकाने बऱ्याच मूलभूत व  एकमेकांशी संलग्न असलेल्या गोष्टींचा उलगडा झाला. हे विज्ञान हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग,पाऊस , विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यासच नव्हे तर त्याही पलीकडचे आहे. माझ्या मते त्यावरील संशोधनास केवळ meteorology म्हणण्यापेक्षा हवामान भौतिकशास्त्र म्हणून संबोधणे जास्त संयुक्तिक ठरेल.

माझ्या मताला एक शास्त्रीय आणि तार्किक मीमांसा आहे. हवामानशास्त्र हा "उल्का" चा अभ्यास नाही. त्याचा अभ्यास आहे metéōros, "हवेतील गोष्टींसाठी" ग्रीक या "गोष्टी" मध्ये वातावरणास बंधनकारक घटनांचा समावेश आहे: तापमान, हवेचा दाब, पाण्याची वाफ, तसेच ते सर्व कसे संवाद साधतात आणि कालांतराने बदलतात - ज्याला आपण एकत्रितपणे "हवामान" म्हणतो. हवामानशास्त्र केवळ वातावरण कसे वागते याकडेच पाहत नाही तर ते वातावरणातील रसायनशास्त्र (त्यातील वायू आणि कण), वातावरणाचे भौतिकशास्त्र (त्याची द्रव गती आणि त्यावर कार्य करणारी शक्ती) आणि हवामानाचा अंदाज देखील पाहात असते. 

चक्रीवादळे निसर्ग धर्माला अनुसरून असली तरीही गेल्या ५० वर्षात त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशातील काही किनारी भाग जसे गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा व तमिल नाडु यांना त्याचा सतत फटका बसत आलाय. त्याला कारणीभूत मुख्यतः मनुष्याने केलेली निसर्गाची केलेली परवड. त्या आधी निसर्ग हा बऱ्यापैकी शिस्तशीर होता. सगळी मोसम वेळेत जात व येत. हल्ली निसर्गाला कसला ही घरबंध नाही. असो. चक्रीवादळे ही निसर्गाने मनुष्याला केलेली व्याजासकटची परतफेड आहे. चक्रीवादळे नेमकी कशी तयार होतात, त्यांना नावे कशी मिळतात, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच सर्वाधिक चक्रीवादळे का निर्माण होतात, याचा वेध… 

समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सि अंश तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते. चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो.

भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातूनच जन्माला येतात. याचे कारण लपले आहे दोन्ही समुद्रांच्या तापमानात. बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सून आधी आणि मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत उबदार असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर खास करून ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यातही वैशष्ट्यिपूर्ण बाब म्हणजे भौगोलकि रचना. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याला पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीन असल्याने वाऱ्यांना कमी जागा मिळते. त्यामुळेच ते अधिक विध्वंसक बनवतात. याच्या उलट अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाला आजूबाजूला केवळ समुद्र असल्याने ते लवकर विरते. बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर ४ : १ आहे. 

हवामान संबंधातील बातम्या व लेख लिहिताना हे प्रकर्षाने जाणवले असे की त्या अनुषंगाने येणारे शास्त्रीय शब्द व त्यांच्या व्याकरणात्मक घटक तयार करणारे एक किंवा अधिक शब्दांची अभिव्यक्तीचे आकलन अतिशय आवश्यक आहे. जास्त खोलात न शिरता ही त्यातील भौतिकशास्त्राचा गाभा स्पष्ट होत होता.

हे सगळे सांगण्या मागचा खटाटोप एवढ्या साठीच की ह्या शास्त्राला आता Meteorology च्या ऐवजी Climate Physics म्हणणे योग्य ठरेल. शिवाय त्या शास्त्राला एक वजन प्राप्त होईल। लिहिण्यासारखे खरे तर अजुन बरेच काही आहे पण हा विषय सर्वव्यापी व परिपूर्ण असल्याने त्या संबंधी विस्तारित आणि प्रासंगिक चर्चा पुन्हा कधीतरी.

No comments:

Post a Comment

Rewriting Protocols: Balancing tradition with practical governance

Raju Korti Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis recently issued an order to end the practice of giving a guard of honour and present...