Friday, May 7, 2021

पुस्तके लिहिण्याचा हव्यास 

राजू कोरती

साधारण पाचवी सहावीत असेंन। ओठांवर अजून मिसरूड पण फुटले नव्हते. शाळेत जायचे, खेळायचे व अभ्यास करण्यापलिकडचे जग ठाऊक नव्हते. आज जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त वर्षानंतर त्या प्रसंगाची आठवण आली की त्यामागे काही दैवी संकेत असावा असे वाटते. 

आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भारद्धाज सर अतिशय शिस्तप्रिय आणि कड़क.कधी ही कोणावर हात उगारला नाही की कोणावर आगपाखड़ केली नाही पण त्यांच्या नजरेत प्रचंड धाक आणि जरब होती. अर्थात तो काळच वेगळा होता. आज कालचे विद्यार्थी शिक्षकांना जसे लाडिकपणे "हाय सर" वगैरे करतात तसले काही नव्हते। शिक्षकांच्या डोळ्याला डोळे भिड़वणे तर सोडाच, मान वर करून बघायची सुद्धा बिशाद नव्हती.
 
इंग्रजी, हिंदी व मराठी भाषा तितक्याच अस्खलितपणे बोलणाऱ्या पण मातृभाषा तमिळ असलेल्या भारद्धाज सरांची एक विशिष्ट सवय होती. दिवसातून एकदा तरी ते कोणत्याही वर्गात जात व  कोणाला ही  एखादा प्रश्न विचारित. हे प्रश्न अभ्यासक्रमातील नसून सामान्य विषया वरील असत. आता मागे वळून बघताना जाणवते की ह्या मागे त्यांचे बहुधा दोन हेतू असावेत. मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यावर वचक आणि त्यांच्या मानसिक तयारीची तपासणी.

त्या दिवशी ते आमच्या वर्गात अचानक आले आणि वर्गात नेहमी प्रमाणेच चिडीचूप  झाली. त्यांनी मागील बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याला खुणेनेच उभे केले आणि विचारले "What is your staple diet?" अजिबात न डगमगता त्याने सांगितले "Sir my staple diet is roti, sabzi, dal and rice." मान हलवित त्यांनी उत्तराची पोच दिली आणि त्यांची भिरभिरणारी नजर माझ्यावर स्थिरावली. माझा भेदरलेला चेहरा बघून त्यांनी           
 स्वभावानुसार पुढचा प्रश्न मलाच विचारला. " भविष्यात काय करायचा विचार आहे?" त्या प्रश्नाने मी पुरता बावचळलो. पण का की माझ्या तोंडातून उत्तर आपसुकच बाहेर पडले. "मला खुप पुस्तके लिहायची आहेत." त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यात मला कुतूहल दिसले. बहुधा त्यांची अपेक्षा मी इंजीनियर डॉक्टर होइन अशा काहीशा उत्तराची होती. ते बोलले काहीच नाहीत व तसेच मान हलवीत बाहेर पडले. आपण काही तरी  आगाउपणा केला आहे ह्या विचाराने मी मात्र धास्तावलो होतो. पुढे पाच वर्षानंतर शाळा सोडताना मी जेंव्हा त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हाचे ते वाक्य आजही कानात घोंगावते: "I hope you will be true to your words. Let me see how many books you write."

आज मी तीन पुस्तके लिहिली आहेत आणि चौथे आणि पाचवे प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत पण लॉकडाउन मध्ये रखडली आहेत. शाळेतून बाहेर पडून Engineering , Science , Law, Journalism, MBA आणि Management Sciences सारखे भिन्न अभ्यासक्रम करीत असतानाही भारद्धाज सरांचे ते वाक्य बरेचदा कानात घूमत असायचे. पुढे नियती ने मला पत्रकारितेकड़े खेचले व माझा नवशिक्या लेखकाचे रूपांतर व्यावसायिक लेखकात झाले.

मला आठवते घरात लहानपणा पासून सगळ्यांना संगीताची आवड होती. विशेषतः जुन्या चित्रपटातील रफी साहेबांची गाणी विलक्षण आवडायची. त्यांच्या दैवी आणि स्वर्गीय आवाजाच्या जादुवर फ़िदा असलेली आम्ही मित्रमंडळी तासनतास त्यांनींगायलेल्या गीतांवर काथ्याकूट करत असायचो. आमचे आक्खे विश्व रफीमय झाले होते. त्यांच्या आवाजाचा बाज, त्यांच्या आवाजातील त्या अदभूत हरकती, तार सप्तकात लीलया पोचण्याची मजल अशा एक ना अनेक गोष्टींवर बोलताना आम्ही थकत नसू.

माझे रफी प्रेम आणि लेखनाची आवड बघता मला बरेचदा माझे मित्र व सहकारी मला त्यांचे आत्मचरित्र लिहायला गळ घालीत पण मी ते प्रत्येक वेळेस चेष्टेवारी नेत असे. रफ़ी साहेबांच्या अमर्याद आणि आभाळा एवढ्या कर्तृत्वाला गवसणी घालण्याचे धाडस करण्याचा प्रश्नच नव्हता. पण २०१४ च्या सुमारास माझी धीरेंद्र जैन ह्या film journalist ची ओळख झाली आणि त्याने मला मदतीचे आश्वासन देऊन माझ्या मनाची तयारी केली. हृदयविकाराने ग्रस्त अवस्थेत मी ते ४०० पानी पुस्तक दोन महिन्यात लिहून काढले. माझे डॉक्टर मित्र सुहास देशपांडे यांची मोलाची मदत झाली व पुढे त्या पुस्तकाचे विमोचन सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम ह्यांच्या हस्ते झाले.
 
८०० रुपये किम्मत असलेल्या ह्या पुस्तकांच्या सर्व प्रति हातोहात खपल्या आणि bestseller च्या मालिकेत जाऊन बसले. देशात आणि London Book Fair मध्ये पुस्तकाला पंचतारांकित rating मिळून त्याला Best Biography category madhye साहित्य अकादमी पुरस्कारासाठी सुद्धा नामांकन मिळाले. अर्थात ह्याचे श्रेय मला नसुन माझे मित्र, परिवारातील सदस्य, सगळ्या हितचिंतकाना आणि रफ़ी साहेबांना जाते. मी केवळ निमित्तमात्र.

हे सगळे सांगण्या मागचे प्रयोजन हे की मागील वर्षी हे पुस्तक Amazon वर ८५०० रुपयांना विकले  गेले आणि आज पाहिले की त्याची नविन आवृत्ति २९९० रुपयांना विकली  जात आहे. Mohammed Rafi, God's Own Voice चे हिन्दी अनुवादित मोहम्मद रफ़ी, स्वयं ईश्वर की आवाज़ ला पण उत्तम प्रतिसाद मिळतोय.
 
हा ब्लॉग लिहिण्या मागचा उद्देश स्वतःची पाठ थोपटून घेणे नसुन इतर दोन कारणे आहेत. हे पुस्तक माझ्याकडून खरे तर रफ़ी साहेबांनी लिहून घेतले. त्याचे श्रेय त्यांनीच  दिलेल्या प्रेरणेला जाते.  दूसरे असे की भारद्धाज सरांना दिलेल्या --  वेळ निभाउन नेणारे का असेना -- उत्तराची पूर्णता करू शकलो.

दुर्दैवाने आज रफ़ी साहेब आणि भारद्धाज सर दोघेही हयात नाहीत.


5 comments:

  1. फार सुंदर लिहिलं आहे सर. आतून आलं आहे सगळं आणि म्हणून वाचताना ते अगदी भावतं पट्कन. तुमच्या लेखक होण्याची उर्मी तुम्हाला इथवर घेऊन आली आहे. आता थांबू नका.

    ReplyDelete
  2. फार सुंदर लिहिलं आहे सर. आतून आलं आहे सगळं आणि म्हणून वाचताना ते अगदी भावतं पट्कन. तुमच्या लेखक होण्याची उर्मी तुम्हाला इथवर घेऊन आली आहे. आता थांबू नका.

    ReplyDelete
  3. Thank you Varsha.One day I want to attain your fluency. Bless me.

    ReplyDelete
  4. Thank you Varsha.One day I want to attain your fluency. Bless me.

    ReplyDelete

Rewriting Protocols: Balancing tradition with practical governance

Raju Korti Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis recently issued an order to end the practice of giving a guard of honour and present...