राजू
कोर्ती
माझ्या स्मरणात अजूनही एक धूसर दुपार
ताजी आहे. साधारण १९८३
चा काळ असावा. एका
जुन्या, शांत लायब्ररीत मी
वारंवार पाहत असलेले एक
पुस्तक.‘उपरा’. लक्ष्मण माने यांचे ते
आत्मकथन, जणू एखाद्या वेदनेचा
दस्तऐवज. एक दिवस मी
ते हातात घेतले आणि वाचत गेलो.
पानोपानी उलगडत गेलेली जातिभेदाची निर्दयी वास्तवता, अपमानाची चिरफाड, आणि समाजाच्या कडवट
नजरा. हे सर्व मनाला चटका
लावून गेले. ‘उपरा’ म्हणजे केवळ बाहेरचा नाही,
तर आपल्या जगात असूनही न
स्वीकारलेला, अनोळखी, अनाहूत, अनाम.
तेव्हा मला वाटले होते की हा ‘उपरेपणा’ हा जातीचा, गरिबीचा आणि सामाजिक अन्यायाचा परिणाम आहे. पण आयुष्याच्या पुढच्या वळणांवर मला जाणवले. उपरेपणाची कारणे इतकी सरळ, इतकी एकरेषीय नसतात. काळ बदलतो, संदर्भ बदलतात, पण ‘उपरा’ हा शब्द मात्र त्याच अर्थाने चिकटून राहतो. फक्त त्याची कारणे बदलतात.
आज मी मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की उपरा हा केवळ जातीनं ठरत नाही; तो समाजाच्या बदलत्या ‘अल्गोरिदम’नं ठरतो. एकेकाळी नात्यांचे गणित धर्म, जात, भाषा, संस्कार यावर मांडले जात असे. पण आजचे समीकरण वेगळे आहे. पैसा, प्रतिष्ठा, रूप, पद, सत्ता, आणि प्रभाव. ज्याच्याकडे हे आहे, तो ‘आपला’; ज्याच्याकडे नाही, तो ‘उपरा’.माझ्या आयुष्यातील सर्वात कडवट जाणीव हीच.
मी सवर्ण असूनही (त्याचा अभिमान बाळगावा की लाज वाटावी हे तुम्ही ठरवा) आज उपरा आहे. कधी काळी माझ्याकडे साधनसंपत्ती होती, ओळखी होत्या, माझ्या भोवती माणसांची गर्दी होती. लोक तळहातावर घेऊन फिरवायचे. पण ज्या क्षणी या सर्व गोष्टी निसटल्या, त्या क्षणी नातीही विरघळून गेली. आज माझ्याकडे ना पैसा आहे, ना पद, ना रूप, ना प्रभाव. आणि म्हणूनच, आज मी कुणाचाच नाही.
सॅम्युएल हंटिंग्टनने ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’मध्ये जगातील संघर्षांची कारणे धर्म आणि संस्कृतीत शोधली. पण माझ्या छोट्याशा जगातला संघर्ष वेगळाच आहे. येथे सभ्यता नाही, तर स्थिती बोचते . तुझ्याकडे काय आहे, आणि माझ्याकडे काय नाही, यावर नाती तुटतात, जुळतात, आणि मोडतात. आजचा माणूस विचारांच्या नव्हे, तर वस्तूंच्या आकर्षणाने जोडला जातो.
माणूस जन्मत: उपरा नसतो. त्याला उपरा बनवले जाते. हळूहळू, नजरेआड, शब्दांविना. आणि एकदा का तो या चौकटीत बसला, की त्याचे अस्तित्व नगण्य होते. अपमान हा त्याचा दैनंदिन अन्न बनतो, आणि एकाकीपणा त्याचा श्वास.
माझ्या उमेदीच्या काळात मी अनेकांना आधार दिला. तनाने, मनाने, धनाने. आई-वडील गेले आणि डोक्यावरचे अखेरचे छत्र हरपले. जीवाभावाचे दोन्ही भाऊ काळाच्या पडद्याआड गेले. आयुष्याचा आधार असलेली मोठी बहीणही निघून गेली. इतक्यावर नियती थांबली नाही; मोठ्या भावाचा उमलत्या वयातला मुलगाही हातातून निसटला. प्रत्येक आघात गिळून टाकत राहिलो -- शब्दांविना, आवाजाविना. पण या सगळ्या हानीनंतर जे उरले, ते एक खोल, न बोलता येणारे पोकळीचे जग… आणि त्यात वाढत गेलेले उपरेपण, जे हळूहळू मला नैराश्याच्या अथांग गर्तेकडे ढकलत गेले. पण आज जेव्हा मला आधाराची गरज आहे, तेव्हा माझ्या दारात येणारे पाऊलसुद्धा थांबत नाही. रस्त्यावरचे कुत्रेही कदाचित क्षणभर थांबतील; माणसं मात्र नाही.
हे सगळं लिहिण्यामागे माझा उद्देश केवळ उद्वेग व्यक्त करणे नाही. ही एक नोंद आहे. त्या उपऱ्यांची, जे समाजाच्या काठावर जगतात. जे दररोज जगतात, पण कुणाच्याच स्मरणात नसतात. ज्यांचे आयुष्य एक प्रतीक्षा बनून राहते. शेवटाच्या, मुक्तीच्या.पण मुक्ती इतकी सहज मिळत नाही. ज्याच्या वाट्याला जे आले आहे, ते भोगल्याशिवाय त्याची सुटका होत नाही. म्हणूनच उपरे जगतात किड्यांसारखे. आणि मरतातही तितक्याच शांत, तितक्याच दुर्लक्षित पद्धतीने.

No comments:
Post a Comment